पिंपरी-चिंचवड : आगामी ईद-ए-मिलाद, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सांगवी पोलिसांनी सराईत व समाजविघातक प्रवृत्तीच्या गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईअंतर्गत मोक्का, एमपीडीए तसेच महाराष्ट्रा पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ अन्वये एकूण ३२ सराईत आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या धोरणानुसार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत तीन टोळ्यांमधील २३ सराईत आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, हे आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
तसेच, महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा अर्थात एमपीडीए अंतर्गत दोन सराईत आरोपींवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. यापैकी एक आरोपी छत्रपती संभाजीनगर येथील हार्मुल कारागृहात, तर दुसऱ्या आरोपीला मध्यवर्ती कारागृह, कळंब, कोल्हापूर येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
याशिवाय महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ अन्वये सात सराईत आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल, गुन्हेगारी कृत्य अथवा समाजविघातक प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अशा प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई यापुढेही प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ संदिप आटोळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सांगवी विभाग मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस हवालदार विनोद साळवे, पोलीस हवालदार सचिन सुपे आणि पोलीस अंमलदार प्रदीप गुट्टे यांनी केली.