पिंपरी-चिंचवड : हजरत मोहम्मद पैगंबर जयंती अर्थात ईद-ए-मिलाद निमित्त २६ ऑगस्ट रोजी पिंपरी परिसरात मुख्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील काही प्रमुख मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल जाहीर केले आहेत.
मिरवणूक २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मिलिंदनगर येथील जमाते लतीफीया मज्जिदपासून सुरू होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथील पीएमपीएल मैदानापर्यंत जाणार आहे. मिरवणुकीनंतर पीएमपीएल मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पिंपरी विभागात दुपारी १२ ते मध्यरात्रीपर्यंत बदल
महावीर चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणारा सर्व्हिस रोड, नाशिक फाट्याकडून आंबेडकर चौकाकडे येणारा मार्ग, स्व. इंदिरा गांधी पूल ते आंबेडकर चौक, नेहरूनगर चौक ते आंबेडकर चौक, जयमल्हार खानावळ ते मोरवाडी चौक, सायन्स पार्क ते मोरवाडी चौक तसेच क्रोमा शोरूम ते गोकुळ हॉटेल या मार्गांवरील वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत.
या मार्गावरील वाहतूक डी-मार्ट ग्रेड सेपरेटर, डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर, एच.पी. पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटर, मोरवाडी चौक, मासुळकर कॉलनी, ऑटो क्लस्टर, मदर तेरेसा ब्रिज, बसवेश्वर चौक आणि भाटनगरमार्गे वळविण्यात येणार आहे.
निगडी परिसरातही वाहतूक वळविणार
निगडी वाहतूक विभागाच्या हद्दीत सेंट्रल चौक ते भक्ती-शक्ती चौक, अंकुश चौक ते भक्ती-शक्ती सर्कल, भक्ती-शक्ती सर्कल ते टिळक चौक, टिळक चौक ते खंडोबामाळ चौक, स्वानंद डेअरी चौक ते टिळक चौक आणि विविध ग्रेड सेपरेटरच्या मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे.
वाहनचालकांना काचघर चौक, भेळ चौक, अंकुश चौक, त्रिवेणीनगर, दुर्गा चौक, थरमॅक्स चौक, लोकमान्य हॉस्पिटल आदी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चिखलीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बदल
चिखली वाहतूक विभागात कृष्णानगर चौक ते चेरी चौक, जाधव सरकार चौक ते चेरी चौक, चिखली गाव चौक ते डायमंड चौक, पिंगळे चौक ते पाटीलनगर पंचर, लक्ष्मी चौक ते रिव्हर व्ह्यू चौक, केएसबी चौक ते कुदळवाडी सर्कल तसेच मोई गाव ते डायमंड चौक या मार्गांवर वाहतूक निर्बंध राहणार आहेत.
या मार्गावरील वाहतूक थरमॅक्स चौक, साने चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांती चौक, नेवाळे वस्ती, कुदळवाडी, यशवंतनगर, एमआयडीसी कॉलनी चौक आदी पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे.
मिरवणूक पुढे सरकेल त्याप्रमाणे वाहतूक बंद
पिंपरी, निगडी आणि चिखली वाहतूक विभागाच्या हद्दीत मिरवणूक ज्या मार्गाने पुढे जाईल, त्यानुसार आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी आणि वाहनचालकांनी पोलिसांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी केले आहे.
