पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४ची उल्लेखनीय कामगिरी
पुणे,तळेगाव दाभाडे प्रतिनिधी….पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा, युनिट-४च्या पथकाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दरोड्याचा छडा लावत सहा सराईत आरोपींना निष्पन्न करून ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिक्षा व मोबाईल असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
२१ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता फिर्यादी लोढा सोसायटी, गहुंजे येथे ऑर्डर देऊन झेप्टो स्टोअरसमोरून गहुंजे स्टेडियमच्या दिशेने जात होते. त्यावेळी अनोळखी आरोपींनी रिक्षा आडवी लावून त्यांना जबरदस्तीने रिक्षेत बसविले. त्यानंतर त्यांचे अपहरण करून मामुर्डी येथील स्मशानभूमीजवळील मैदानात नेण्यात आले. तेथे मारहाण करून फिर्यादीकडील ९० हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले होते.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(६), १२६(२), १३७(२), ३(५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने तपास सुरू केला. सुरुवातीला आरोपींबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याने तपास पोलिसांसमोर आव्हानात्मक होता. घटनास्थळापासून गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षेचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तसेच संशयितांचे सीडीआर व तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी सुरज शंकर चलवादी (२४), दिपक दयानंद भंडगे (२४), अविनाश अरुण वानखेडे (२६), प्रथमेश उर्फ प्रतिक हरीभाऊ कंक (२७), विराज उर्फ सनी युवराज हिरवे (१९) आणि ईसाक राजू काजापुरम (२८) या सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मोबाईल असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले आरोपी सराईत असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही दरोडा, जबरी चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील कायदेशीर कारवाईसाठी सर्व आरोपींना तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले तसेच पोलीस अंमलदारांनी केली.
