पुणे प्रतिनिधी: पीएमपीएमएल बसमधून प्रवास करताना पालकांपासून दूर राहिलेल्या १० वर्षीय तेजस पुंडलिक खराटे याला पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सुखरूपपणे त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि माणुसकीचे या घटनेतून दर्शन घडले.
तेजस हा आई-वडील व नातेवाईकांसोबत पीएमपीएमएलच्या बसने प्रवास करीत होता. कर्वेनगर येथे प्रवासाचा निर्णय बदलल्याने त्याचे आई-वडील व नातेवाईक बसमधून उतरले. मात्र, प्रवाशांची गर्दी व घाईगडबडीत तेजस बसमध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही.
मुलगा बसमध्ये राहिल्याचे लक्षात आल्यानंतर वाहक गणेश रांगडे (वाहक क्र. २९९८), चालक आणि तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याचा शोध सुरू केला. वनदेवी परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रजवळ तेजस रडत असताना कर्मचाऱ्यांना आढळून आला. त्यांनी त्याला धीर देत सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाहीसाठी कर्वेनगर पोलीस चौकीत नेले.
PSI नायकवाडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आवश्यक कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर तेजसची ओळख पटवून त्याचे वडील पुंडलिक खराटे आणि आई सीमा खराटे यांच्या ताब्यात त्याला सुखरूपपणे देण्यात आले.
या कामगिरीबद्दल कोथरूड आगाराचे व्यवस्थापक सचिन वाबळे यांनी वाहक गणेश रांगडे आणि क्लार्क नितीन सुरेश पगारे यांचे विशेष कौतुक केले.
पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असून, ‘प्रवासी सेवा हीच जनसेवा’ या भावनेचे या घटनेतून पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.
