पिंपरी-चिंचवड : चिखली परिसरात लहान मुलीवर भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवार दि.२० ऑगस्ट रोजी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन करण्यात आले.
‘मोकाट कुत्रे हटवा, नागरिकांना वाचवा’, ‘महापालिका प्रशासनाचा निषेध’ अशा घोषणा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. नगरसेवक यश साने, संगीता ताम्हणे आणि विकास साने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
चिखलीतील घटनेमुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विविध भागांत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असतानाही त्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. नागरिकांच्या जीविताशी संबंधित या गंभीर प्रश्नावर केवळ कागदी उपाययोजना न करता प्रत्यक्ष आणि प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, आंदोलनकर्त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाळीव कुत्रा महापालिकेच्या मुख्य इमारतीत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्याला विरोध केल्याने हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे काही काळ महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर वातावरण तणावपूर्ण झाले.
यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट, नगरसेवक पंकज भालेकर, विराज लांडे, यश साने, प्रमोद कुटे, विकास साने, संगीता ताम्हणे, वैशाली घोडेकर, भीमाबाई फुगे, अश्विनी वाबळे, अरुणा लंगोटे, सारिका मासुळकर, मनिषा लांडे, प्रियंका कुदळे बारणे, योगिता, स्वाती उर्फ माई काटे, वर्षा जगताप, शेखर चिंचवडे, संतोष कोकणे, तुषार सहाणे, अनंत कोऱ्हाळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, फजल शेख आदी उपस्थित होते.
तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नागरिकांना सुरक्षितता देण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात. अन्यथा यापुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
