खुनाचा गुन्हा दाखल; आरोपी अटकेत
आळंदी प्रतिनिधी: आळंदी देवाची येथील प्रदर्शन रोड परिसरात लोखंडी सळईने डोक्यात, तोंडावर व पायावर जोरदार वार करून एका व्यक्तीचा खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.४० वाजण्याच्या सुमारास भाई मनोहर कोतवाल गोदी कामगार धर्मशाळा, आळंदी देवाची येथील प्रदर्शन रोडवरील वृंदावन स्नॅक्स भोजनालयासमोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली.
या प्रकरणी दत्तात्रय शेषेराव कांदे (वय ३७, व्यवसाय मजुरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, अनंत दिगंबर तोर (वय ३०, रा. शेलगाव दांडी, ता. माजलगाव, जि. बीड) हा हातात लोखंडी सळई घेऊन घटनास्थळी आला. त्याने बाबासाहेब उर्फ राहत कांबळे यांना शिवीगाळ करत, १६ ऑगस्ट रोजी झोपण्याच्या कारणावरून फिर्यादीला आईवरून शिवीगाळ का केली, असा जाब विचारला.
यानंतर संतापलेल्या आरोपीने लोखंडी सळईने डोक्यावर, तोंडावर व पायावर चार ते पाच जोरदार वार करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.घटनेनंतर आळंदी पोलिसांनी आरोपी अनंत तोर याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि जाधव करीत आहेत.