पिंपरी-चिंचवड, दि. १८ ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या काही दिवसांत सायबर फसवणूक, मारहाण, रस्ते अपघात, अमली पदार्थांची विक्री तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये बावधन परिसरातील एका व्यावसायिकाची तब्बल २ कोटी २० लाख रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
व्हॉट्सॲपचा गैरवापर करून २.२० कोटींची फसवणूक
सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, कनवरजीत सिंग सेहगल (वय ५४, व्यवसाय ऑटोमोबाईल डिलर) यांच्या अकाउंट एक्झिक्युटिव्हच्या व्हॉट्सॲप क्रमांकाचा अज्ञात व्यक्तीने गैरवापर केला. फिर्यादींचा व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक करून त्यांच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीच संबंधित व्यक्तीशी बोलत असल्याचा भास निर्माण करून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण २ कोटी २० लाख रुपये पाठविण्यास सांगण्यात आले. या प्रकारातून आर्थिक फसवणूक झाल्याने सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूसाठी पैसे न दिल्याने पतीवर जीवघेणा हल्ला
काळेवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात, दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून २२ वर्षीय तरुणाने महिलेच्या पतीवर दगड व बांबूने हल्ला केल्याचा आरोप आहे. थेरगावातील जगतापनगर परिसरात हा प्रकार घडला. हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
छत्रपती चौकात बोलावून तिघांकडून मारहाण
सांगवी परिसरातही मारहाणीची घटना घडली. फिर्यादीस फोन करून छत्रपती चौकाजवळ बोलावण्यात आले. तेथे तीन आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील एका आरोपीने वाहनाजवळील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यात मारल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
कामावरून काढल्याच्या रागातून राडा
सांगवी पोलीस ठाण्यात दाखल आणखी एका गुन्ह्यात, कामावरून काढल्याच्या रागातून तिघांनी एका व्यक्तीला लाकडी बांबू व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी चारचाकी वाहनातून पसार झाले.
घरगुती वादातून भावावर बॅटने हल्ला
हिंजवडी पोलीस ठाण्यात घरगुती वादातून मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मारुंजी येथील फ्लॅटमध्ये भावानेच वकिल असलेल्या भावाला शिवीगाळ करून लाकडी बॅटने हाताच्या मनगटावर व गुडघ्यावर मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
रिक्षाच्या धडकेत मायलेक गंभीर जखमी
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल अपघाताच्या गुन्ह्यात, चिखली-चिंचवड बीआरटी मार्गावर रिक्षा व दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाले, तर त्याच्या आईच्या हातातील तसेच पायातील हाडांना गंभीर दुखापत झाली. रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिघीत ९८० ग्रॅम गांजा जप्त
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करत एका ४२ वर्षीय महिलेच्या ताब्यातून ९८० ग्रॅम गांजा व १,५०० रुपये रोख, असा एकूण सुमारे ५०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गांजा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकणमध्येही गांजासह तरुणाला अटक
चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी एका ३२ वर्षीय व्यक्तीला ४३६ ग्रॅम गांजासह ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे १२,५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे.
शिरगावमध्ये कोयता बाळगणाऱ्यावर कारवाई
शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १९ वर्षीय तरुणाकडून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. परवानगीशिवाय शस्त्र बाळगल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायद्यासह महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विविध घटनांमुळे पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात सायबर गुन्हे, हिंसक मारामारी, अंमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदा शस्त्र बाळगण्याच्या घटनांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. संबंधित गुन्ह्यांचा तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.