पुणे आळंदी प्रतिनिधी…आळंदीतील भाजी मंडई परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून भाजी विक्रेत्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन भावांविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता बडगाव रोडवरील भाजी मंडई येथे हा प्रकार घडला. तुषार मोहन कोळेकर (वय २६, रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार, मागील वर्षी दिलेले ५ हजार रुपये परत कधी देणार, अशी विचारणा केल्याने आरोपी अक्षय कृष्णा कोळेकर (वय २७) याने फिर्यादीला शिवीगाळ करून बांबूने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीला वाचवण्यासाठी त्यांचा चुलत भाऊ चैतन्य कोळेकर पुढे आला असता त्यालाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर आरोपी अक्षयचा भाऊ कृणाल कोळेकर (वय २५) याने फिर्यादी घरी जात असताना वडगाव घाटात शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.