वाकड/ताथवडे प्रतिनिधी : भुमकर चौक ते डांगे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल किया इनसमोर राँग साईडने भरधाव वेगाने आलेल्या स्कूल कॅनने स्कुटरला धडक दिल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास घडली. या अपघातात स्कुटरस्वाराच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदिप सुरेश बरसेया (वय ४६, रा. राहटणी, पुणे) हे त्यांच्या स्कुटर क्रमांक एमएच १४ जे ५७४६ वरून भुमकर चौकाकडून डांगे चौकाच्या दिशेने जात होते. त्यावेळी डांगे चौकाकडून समोरून राँग साईडने स्कूल कॅन क्रमांक एमएच १२ आरडी ६७२० वरील चालक भरधाव वेगाने आला.
चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन अविचाराने चालवत फिर्यादींच्या स्कुटरला धडक दिली. धडकेमुळे बरसेया हे स्कुटरसह रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपी स्कूल कॅन चालकाविरुद्ध बीएनएस कलम २८१, २८५, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे व पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.