पिंपरी : पिंपरी गावातील महात्मा फुले महाविद्यालय तसेच नव महाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणाची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून, मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल, गाळ आणि अस्वच्छता निर्माण झाली आहे. उद्या १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिन असल्याने या क्रीडांगणावर विविध कार्यक्रम होणार असताना मैदानाची झालेली दुरवस्था चिंतेचा विषय ठरत आहे.
पावसामुळे क्रीडांगणावर ठिकठिकाणी चिखल व गाळ साचला असून, मैदानाचा वापर करणेही विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी अडचणीचे झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने मैदानाची पाहणी करून साफसफाई तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे करावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी केली आहे.
“क्रीडांगण व स्टेडियमची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. १५ ऑगस्टच्या कार्यक्रमापूर्वी मैदानाची तातडीने साफसफाई करून चिखल व गाळ हटवावा. विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित मैदान उपलब्ध करून द्यावे,” अशी मागणी सुहास कुदळे यांनी केली.
दरम्यान, संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन क्रीडांगण व स्टेडियमची तातडीने साफसफाई व दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
