पुणे,हिंजवडी प्रतिनिधी…..पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) सायंकाळी ७ वाजण्यापूर्वी मारुंजी येथील साईरंग डेव्हलपर्स यांच्या प्लॉटिंगमधील पत्र्याच्या शेडजवळ एक अनोळखी पुरुष मृतावस्थेत आढळून आला. मृताची अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाची असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून मृताच्या हनुवटीवर तसेच डोक्यात कोणत्यातरी वस्तूने गंभीर मारहाण करून त्याचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृताची ओळख पटविण्यासह आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याप्रकरणी सुयश गजानन बुचडे (वय ४०, रा. सिद्धिविनायक नगर, ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी, मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पांढरे,पोलिस उपनिरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.