पुणे (प्रतिनिधी) : कुदळे फौंडेशनच्या वतीने आणि ‘एस स्पायसेस’ रेस्टॉरंटच्या सहकार्याने खडकी बाजार परिसरात नागरिकांसाठी मोफत अन्नदानाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सुमारे एक हजार नागरिकांनी मोफत भोजनाचा लाभ घेतला.
खडकी बाजार येथील व्हीलक्स टॉकीज कॉम्प्लेक्समधील ‘एस स्पायसेस’ रेस्टॉरंटसमोर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात बाजारात आलेल्या नागरिकांना मोफत बिर्याणी, रायता आणि गुलाबजाम वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या वेळी कुदळे फौंडेशनचे नानासाहेब कुदळे यांनी खडकी परिसरातील मान्यवरांचे स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कुदळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत कुदळे परिवाराच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
‘कुदळे परिवाराने आजवर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा जपला आहे. भविष्यातही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम राबविण्यात येतील,’ असे व्यवस्थापकीय संचालक नीरज कुदळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शुभम कुदळे यांनी केले. या उपक्रमासाठी कुदळे फौंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
