पिंपरी-चिंचवड, दि. ७ ऑगस्ट २०२६ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भारताच्या इतिहासाविषयी कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करण्यापूर्वी अभिजीत दीपके यांनी वस्तुनिष्ठ आणि सखोल अभ्यास करावा. आंदोलनाच्या नावाखाली अराजकता निर्माण करणे, निराधार आरोप करणे अथवा प्रसिद्धीसाठी दिशाभूल करणारी विधाने करणे योग्य नाही. आंदोलन हे लोकशाहीचे माध्यम असले तरी त्याआडून देशविरोधी विचारांना खतपाणी घालणे कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-सरकार्यवाह अतुलजी लिमये यांनी सीजेपी (CJP) आंदोलनासंदर्भात संघाची भूमिका मांडली होती. त्यावर अभिजीत दीपके यांनी केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार गोरखे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
संघाच्या शंभर वर्षांच्या राष्ट्रकार्याचा अभ्यास आवश्यक
आमदार गोरखे म्हणाले, अतुलजी लिमये यांनी संबंधित आंदोलनाबाबत अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध भूमिका मांडली. मात्र, त्यावर प्रतिक्रिया देताना अभिजीत दीपके यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात संघाने अवमान केल्याचा आणि महात्मा गांधी यांच्या हत्येत संघाचा सहभाग असल्याचा जुना आरोप पुन्हा केला आहे. अशा प्रकारची विधाने करण्यापूर्वी संघाचा इतिहास, भारतीय संस्कृती आणि संघाचे शंभर वर्षांचे राष्ट्रकार्य यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या शतकभरात भारतीय संस्कृती, सामाजिक समरसता आणि राष्ट्रभावना दृढ करण्यासाठी कार्य केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. संघाच्या नेतृत्वातील सरकार्यवाह आणि अखिल भारतीय सह-सरकार्यवाह ही अत्यंत जबाबदारीची पदे आहेत. त्यामुळे अशा पदावरील व्यक्तींनी मांडलेल्या विचारांवर टीका करताना तथ्य आणि ऐतिहासिक संदर्भांचा आधार असणे आवश्यक आहे, असे गोरखे म्हणाले.
गांधी हत्या प्रकरणाचा ऐतिहासिक संदर्भ तपासावा
महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप करण्यात आले होते; मात्र न्यायालयीन प्रक्रियेत संघाला दोषी ठरवण्यात आले नाही, असा दावा आमदार गोरखे यांनी केला. संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगणाऱ्यांनी या ऐतिहासिक संदर्भाचाही विचार करावा, असे ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघाने अपमान केल्याचा आरोपही वस्तुस्थितीला धरून नसल्याचे सांगताना गोरखे यांनी महात्मा गांधी यांनी १९३४ मध्ये वर्धा येथील संघ शिबिराला भेट दिल्याचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४० मध्ये संघाच्या शाखेला भेट दिल्याचा ऐतिहासिक संदर्भ असल्याचे नमूद केले.
इतिहासाचा अपूर्ण किंवा सोयीस्कर अर्थ लावून समाजात संभ्रम निर्माण करणे अयोग्य आहे. सार्वजनिक जीवनात वक्तव्य करताना ऐतिहासिक संदर्भांची पडताळणी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी भूमिका नको
दिल्लीतील आंदोलनाचा संदर्भ देताना आमदार गोरखे म्हणाले की, संबंधित आंदोलनात भारतविरोधी घोषणा, भारतीय संस्कृतीचा अवमान करणारी वक्तव्ये तसेच देशाच्या नेतृत्वाविषयी अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे दिसून आले. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे; मात्र आंदोलनाच्या माध्यमातून देशविरोधी विचारांना प्रोत्साहन देणे अथवा समाजात तेढ निर्माण करणे स्वीकारार्ह नाही.
‘भारताची सांस्कृतिक परंपरा आणि राष्ट्रीय मूल्यांचे जतन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने कार्यरत आहे. त्यामुळे सार्वजनिक वक्तव्य करण्यापूर्वी इतिहास, संविधान, न्यायव्यवस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा सखोल अभ्यास करावा,’ असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी अभिजीत दीपके यांना केले.
