पिंपरी-चिंचवड : नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने पोलीस सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सांगवी विभागासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेश व मार्गदर्शनानुसार या नवीन कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी चौबे यांच्या हस्ते कार्यालयाच्या फलकाचे अनावरण तसेच फित कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पोलीस आयुक्त चौबे यांनी सहायक पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांना शुभेच्छा देत, नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देण्यासाठी कार्यक्षमतेने आणि समर्पित भावनेने काम करण्याच्या सूचना दिल्या. आधुनिक सुविधा, सुबक कार्यालयीन वातावरण आणि अद्ययावत कार्यप्रणालीमुळे नागरिकाभिमुख पोलीस सेवा अधिक प्रभावी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन सोहळ्यास पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१ संदिप आटोळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) रोहिदास पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ प्रदीप जाधव, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३ मारुती जगताप, पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख, पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) धीरज पाटील, सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग प्रशांत ढोले, सहायक पोलीस आयुक्त सांगवी विभाग मनिषा कदम, तसेच परिमंडळ-१ मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सांगवी विभागातील कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
नवीन कार्यालयामुळे सांगवी विभागातील नागरिकांना पोलीस प्रशासनाशी संबंधित कामकाजासाठी अधिक सुलभ आणि प्रभावी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
