चिखली, दि. ३ ऑगस्ट : चिखली परिसरातील पूर्णानगर येथे लघुशंकेच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान जीवघेण्या हल्ल्यात झाले. लोखंडी रॉड, दगड आणि धारदार शस्त्रांनी दोन तरुणांवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी अभिषेक प्रकाश घनघाव (वय २६, रा. डिफेन्स कॉलनी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश कसबे, आयुष ज्ञानेश्वर फडतरे आणि त्यांच्या अन्य ६ ते ७ साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आकाश कसबे याला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ७ वाजता भोसले पेट्रोल पंपाजवळील कान्हा-१५ बार अँड रेस्टॉरंटसमोर फिर्यादी अभिषेक घनघाव हे त्यांचे मित्र सुप्रीम राजू काळे आणि साहिल भिसे यांच्यासोबत घरी जात होते. त्यावेळी लघुशंकेच्या कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपींनी त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले.
फिर्यादी मोटारसायकलवरून निघत असताना आरोपींनी त्यांना अडवून गाडीची चावी काढून घेत शिवीगाळ व मारहाण सुरू केली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या साथीदारांनी लोखंडी रॉडने फिर्यादीच्या पायावर व डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले. फिर्यादी तेथून पळून जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर फिर्यादीचा मित्र सुप्रीम काळे याला खाली पाडून दगड, लोखंडी रॉड, धारदार शस्त्रे तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
हल्ल्यादरम्यान घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनाही आरोपींनी “पुढे आलात तर एकेकाला सोडणार नाही,” अशी धमकी देत हातातील शस्त्रे दाखवून दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.