शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आर्थिक नुकसानीवर तातडीने कारवाईची विनंती
सिंधुदुर्ग प्रतिनिधी : बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलमधील बारावीच्या सहा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
संघटनेच्या वतीने शाळेच्या संस्थाचालकांवर विद्यार्थ्यांची फसवणूक करणे, शिक्षणाच्या नावाखाली खोटी आश्वासने देणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक नुकसान केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले. यासंदर्भात यापूर्वीही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आल्याचे संघटनेने सांगितले.
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कणकवली यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात शाळेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले असून, पंचायत समितीच्या सभेत या विषयावर चर्चा होऊन शाळेची मान्यता रद्द करण्याबाबतची शिफारस करण्यात आली असल्याचेही संघटनेने निदर्शनास आणून दिले. पुढील कार्यवाहीसाठी अहवाल पाठविण्यात आला असला तरी अद्याप विद्यार्थ्यांच्या नुकसानीबाबत शाळेकडून कोणताही तोडगा काढण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणी संस्थाचालकांची भेट घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; मात्र त्यांनी भेट देण्यास नकार दिल्याचा दावा संघटनेने केला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान करणाऱ्या संबंधित शाळेविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
यावेळी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर तसेच पालक किशोर ठाकरे, कालिदास परब, सावंत, देवळेकर आदी उपस्थित होते.
