पिंपरी, दि. ३ ऑगस्ट : भोसरी येथील कौटुंबिक मिळकतीच्या विकास व्यवहारात आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करत विशाल चोरडिया कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे संचालक कुणाल दिलीप चोरडिया यांच्याविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी विनोद अनंता धुमाळ यांनी केली आहे. यासंदर्भात सोमवारी पिंपरी येथील नमस्कार हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
धुमाळ यांनी सांगितले की, वडील दिलीप मोतीलाल चोरडिया, मुलगा कुणाल दिलीप चोरडिया आणि मध्यस्थ प्रफुल्ल इनामदार यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर २२ डिसेंबर २००६ रोजी कुलमुखत्यारपत्र (दस्त क्र. १०३९७/२००६) आणि विकास करारनामा (दस्त क्र. १०३९६/२००६) हवेली क्रमांक १७ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आला. या करारानुसार विकासाच्या मोबदल्यात तळमजल्यावर एक व्यावसायिक गाळा आणि ६५० चौ. फूट सुपर बिल्ट-अप क्षेत्रफळाचा एक फ्लॅट चार वर्षांत देण्याचे मान्य करण्यात आले होते.
या आश्वासनावर विश्वास ठेवून कुटुंबाने विकासासाठी मिळकत दिली. मात्र, जवळपास २० वर्षे उलटूनही विकासकाम सुरू झाले नाही किंवा करारातील अटींची पूर्तता करण्यात आली नाही, असा आरोप धुमाळ यांनी केला.
यासंदर्भात अनेकदा पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाली. अखेर मोबदला अथवा मिळकत परत देण्याची मागणी केल्यानंतर कुणाल चोरडिया आणि प्रफुल्ल इनामदार यांनी धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला. शिवीगाळ करत शर्टाची कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची आणि प्रभावाचा वापर करून कारवाई होऊ देणार नसल्याचेही सांगण्यात आल्याचा दावा धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत केला.
या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असूनही अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. “सामान्य नागरिकाला न्याय मिळवण्यासाठी वारंवार पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी त्यांनी केली.
धुमाळ म्हणाले, “माझी कोणाशीही वैयक्तिक वैरभावना नाही. मात्र, माझ्या कुटुंबाची फसवणूक झाली असून आम्हाला न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा आहे.” या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, तक्रारींच्या प्रती आणि अन्य माहिती पोलिसांकडे सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात न्याय न मिळाल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे दाद मागण्याबरोबरच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही धुमाळ यांनी दिला.
