तळेगाव एमआयडीसी | प्रतिनिधी…..मावळ तालुक्यातील आंबी येथे गट क्रमांक ४३० मधील जागेच्या मालकीवरून झालेल्या वादातून दोन गटांमध्ये मारामारी झाल्याची घटना ३० जुलै रोजी घडली. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात रंगनाथ शंकर घोजगे (वय ५५, रा. आंबी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील भागवत, संकेत दडे आणि गणेश तांगडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपींनी संगनमत करून गट क्रमांक ४३० मधील शेडच्या पत्र्याचे नुकसान केले. तसेच शेतीची अवजारे शेडबाहेर फेकून दिली आणि नाव असलेल्या फलकावर काळा रंग लावून नुकसान केल्याचा आरोप आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या घोजगे यांना आरोपींपैकी एकाने सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या पुतण्याला शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूने स्वप्नील सूर्यकांत भागवत (वय ३८, रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रंगनाथ शंकरराव घोजगे, अंकश घोजगे आणि मच्छिंद्र पोजने यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२, ११५(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, भागवत हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गट क्रमांक ४३० येथील जागेवर मालकी हक्काबाबत जाहिर नोटीसचा फलक लावण्यासाठी गेले असता आरोपी क्रमांक एकने हातातील लाकडी काठीने त्यांच्या खांद्यावर मारहाण केली. तसेच इतर दोन आरोपींनी शर्टाची कॉलर पकडून त्यांना जमिनीवर पाडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून सुरू असून, आंबी येथील गट क्रमांक ४३०च्या जागेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तक्रारींतून समोर आले आहे.