पिंपरी-चिंचवड : ताथवडे येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेतील आरोपीवर कायद्यानुसार कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित मुलींना व त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
या अमानुष घटनेमुळे समाजाच्या विविध स्तरांत संतापाची लाट निर्माण झाली असून, महिलां व बालकांच्या सुरक्षेबाबत अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली. मोर्चादरम्यान उपस्थित नागरिकांनी अशा गंभीर गुन्ह्यांविरोधात एकजुटीने आवाज उठवत आरोपीला कठोर शिक्षा होण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना मोर्चातील सहभागी म्हणाले की, महिला आणि बालकांची सुरक्षितता ही शासन तसेच समाजाची सर्वोच्च जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे आणि पीडितांना तातडीने न्याय देणे आवश्यक आहे.
पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण समाजाने ठामपणे उभे राहावे आणि दोषींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेला वेग देण्यात यावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
