पिंपरी-चिंचवड, दि. २८ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत करण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तालयाने आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) मिक्सर वाहनांच्या वाहतुकीसंदर्भात नवीन अधिसूचना जारी केली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड आरएमसी असोसिएशनसोबत झालेल्या संयुक्त बैठकीतील निर्णयानुसार हे बदल करण्यात आले असून, ते २९ जुलै २०२६ पासून अंतिम एसओपी (Standard Operating Procedure) तयार होईपर्यंत लागू राहतील.
पोलीस उप आयुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, यापूर्वी आरएमसी मिक्सर वाहनांवर लागू असलेले निर्बंध रद्द करण्यात आले असून, त्याऐवजी तात्पुरते सुधारित नियम लागू करण्यात आले आहेत.
नवीन वाहतूक नियम पुढीलप्रमाणे :
🔴शनिवार व रविवार : सायंकाळी ४.०० ते रात्री ९.०० या कालावधीत प्रवेशबंदी कायम राहील. उर्वरित वेळेत आरएमसी वाहनांना शहरात प्रवेशास शिथिलता देण्यात आली आहे.
🔴सोमवार ते शुक्रवार : सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेतच आरएमसी वाहनांना प्रवेश दिला जाईल. सायंकाळच्या गर्दीच्या (पीक अवर्स) वेळेत निर्बंध कायम राहतील.
महत्त्वाच्या अटी :
💮प्रत्येक आरएमसी वाहनावर ३६० अंशांचा कॅमेरा बसविणे किंवा वाहनासोबत क्लिनर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
💮प्रत्येक आरएमसी प्लांटवर डी.डी. मशीन बसविणे आवश्यक असून, मिक्सर वाहन प्लांटमधून बाहेर पडण्यापूर्वी त्या मशीनद्वारे तपासणी करणे अनिवार्य असेल.
💮हे सर्व बदल प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी लागू राहतील.
💮या अधिसूचनेत हायवा, डंपर, ट्रक आणि इतर जड वाहनांच्या वाहतुकीत कोणताही बदल किंवा शिथिलता देण्यात आलेली नाही.
वाहतूक शाखेने संबंधित सर्व वाहतूक विभागांना या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, नागरिक आणि आरएमसी वाहनचालकांनी नवीन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.