वाकड प्रतिनिधी, दि. २८ जुलै २०२६: वाकड पोलिस ठाण्यात एका ६१ वर्षीय व्यक्तीविरुद्ध दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४(२)(आय), ६४(२)(एम), ६५(२), ७४, ७६, ३५१(३), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ मधील कलम ४, ६, ८, १२ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारदार महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मे २०२६ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत आरोपीने फिर्यादी यांच्या १० वर्षीय मुलीला जबरदस्तीने आपल्या घरी नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादी यांच्या ४ वर्षीय मुलीला देखील जबरदस्तीने आरोपीच्या घरी नेल्याची माहिती फिर्यादींना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी दि. २८ जुलै २०२६ रोजी पहाटे २:५५ वाजता आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून, तपास सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे (वाकड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.