सांगली, दि.२७ जुलै : सांगलीतील राजवाडा परिसरातील अप्पर तहसीलदार कार्यालयात दररोज विविध कामांसाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, कार्यालय परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून अप्पर तहसीलदार अश्विनी वरोटे यांची भेट घेतली. यावेळी परिसराची तातडीने स्वच्छता करावी तसेच महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
यावर अप्पर तहसीलदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती देत, लवकरच आवश्यक स्वच्छतागृह उभारण्यात येतील, असे आश्वासन दिले.
यावेळी ह्यूमन राइट्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख मोहन धनवडे, जिल्हा निरीक्षक मोहन पाटील (नाना) आणि वाळवा तालुका अध्यक्ष सुभाष पाटील उपस्थित होते.
