पिंपरीत डॉ.पी.डी. पाटील यांचा ‘शिक्षणमहर्षी’ पुरस्काराने सन्मान
पिंपरी, दि.२६ जुलै : आषाढी एकादशीच्या पावन राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे आयोजित दिंडी व कामगार वारकरी मेळाव्यात डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना ‘शिक्षणमहर्षी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यास चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद सदस्या उमाताई खापरे, भाजपचे शहर प्रभारी भरत नाना पाटील, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, वारकरी व श्रमिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी डॉ. पी. डी. पाटील यांच्या चार दशकांहून अधिक काळातील शैक्षणिक कार्याचा गौरव करताना, हा पुरस्कार शासनाचा नसून समाजाचा सन्मान असल्याचे सांगितले. डी. वाय. पाटील संस्थेमुळे हजारो सर्वसामान्य, कामगार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थी डॉक्टर, अभियंते आणि आयटी क्षेत्रात यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सोशल मीडियातील पत्रकारांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंतीही त्यांनी केली.
सत्काराला उत्तर देताना डॉ. पी. डी. पाटील यांनी हा सन्मान अत्यंत भावनिक असल्याचे सांगितले. गेली ४५ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची संधी लाभली असून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा जागतिक स्तरावर विस्तार झाल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. या पुरस्काराचे श्रेय सहकारी आणि समाजाला देत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे आभार मानले.
आमदार शंकरराव जगताप यांनी डी. वाय. पाटील संस्थेने पिंपरी-चिंचवडची ओळख जागतिक स्तरावर पोहोचवल्याचे सांगितले. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून अनेकांचे जीवन घडविण्याचे कार्य संस्थेने केले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच श्रमिक आणि वारकरी यांचा संगम घडविणाऱ्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या दिंडी उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले.
माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” या विचाराचा उल्लेख करत, डॉ. पी. डी. पाटील यांनी शिक्षणाची पंढरी उभी करून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविल्याचे सांगितले. यशवंतभाऊ भोसले यांच्या श्रमिक सेवाभावी कार्याचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
आषाढी एकादशीच्या पवित्र वातावरणात वारकरी, श्रमिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतभाऊ भोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन नंदू कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दिनेश पाटील, दीपक पाटील, जयदेव अक्कलकोटे, अमोल घोरपडे, सोमनाथ वीरकर, भरत राणे, दत्तात्रय गायकवाड, राहुल शितोळे, शिरीष सासवडे आणि ओंकार देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
