पिंपरी (पुणे): हार्ट प्रकाशन, पुणे यांच्या वतीने प्रकाशित ‘अजित पर्व’ या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उत्साहात व दिमाखात पार पडले. या कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जीवनप्रवास, कार्यसंस्कृती, शिस्तप्रिय व कार्यक्षम नेतृत्व, विकासदृष्टी आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा वस्तुनिष्ठ आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. हे पुस्तक वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
पुस्तकाचे लेखक प्रकाश जाधव यांनी संशोधन, संदर्भ आणि वास्तववादी मांडणीच्या माध्यमातून अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू प्रभावीपणे उलगडले आहेत.
यावेळी प्रकाशक विनोद शिंदे (हार्ट प्रकाशन, पुणे), सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, ॲड. लक्ष्मण रानवडे, मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, वसंतराव पाटील, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, किरण खोत यांच्यासह अनेक मान्यवर, साहित्यप्रेमी आणि अजितदादांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकाशन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम नव्हता, तर महाराष्ट्राच्या कार्यक्षम, दूरदृष्टीच्या आणि लोकाभिमुख नेतृत्वाला पुस्तकाच्या माध्यमातून वाहिलेली आदरांजली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
