पिंपरी प्रतिनिधी : नीट परीक्षा घोटाळ्यातील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्ली येथे शिक्षणतज्ज्ञ व वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी (दि. १८) ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले.
अपना वतन संघटना आणि शहरातील विविध समविचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी केले. आंदोलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रोहिणी कांबळे, मूलनिवासी संघटनेचे अंजुम इनामदार, समाजवादी पार्टीचे रवी यादव, राजन नायर, ब्रह्मानंद जाधव, प्रदीप पवार, गणेश दराडे, वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे सालार शेख, फेरोज तांबोळी, पँथर सेनेचे राजू सरोदे, प्रकाश घोडके, प्रमोद शिंदे आदी मान्यवर सहभागी झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना मानव कांबळे यांनी सांगितले की, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि सुधारणांसाठी सोनम वांगचुक लोकशाही मार्गाने आंदोलन करत असून त्यांच्या मागण्यांना पिंपरी-चिंचवडमधील विविध सामाजिक संघटनांचा ठाम पाठिंबा आहे.
माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून अन्यायकारक व चुकीच्या धोरणांविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षा घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.
