पुणे : पुणे-शिरूर उन्नत महामार्ग प्रकल्पाबाबत आज आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्य शासनाने देशातील सर्वात लांब ‘डबल डेकर’ उन्नत महामार्ग उभारण्यास मंजुरी दिल्याची माहिती आमदार सुनिलआण्णा टिंगरे यांनी दिली.
या बैठकीस उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार (ऑनलाईन), सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, कृषिमंत्री दत्तामामा भरणे तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. स्व. अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकार होत असल्याचे टिंगरे यांनी नमूद केले.
मंजूर झालेला हा प्रकल्प एकूण ५३ किलोमीटर लांबीचा असून, त्यापैकी सुमारे ३५ किलोमीटरचा भाग उन्नत उड्डाणपूल असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे ७,३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या स्तरावर सहा पदरी महामार्ग उभारण्यात येणार असून, दुसऱ्या स्तरावर रामवाडी ते वाघोलीदरम्यान पुणे मेट्रो धावणार आहे. या दुहेरी वाहतूक व्यवस्थेमुळे वाघोली, खराडी, शिक्रापूर आणि परिसरातील वाहतूक कोंडीत मोठी घट होण्याची अपेक्षा आहे. तसेच पुणे ते शिरूर हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय हा महामार्ग पुढे समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार असल्याने पूर्व पुण्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यासह लाखो नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
राज्य शासनाच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे स्वागत करत आमदार सुनिलआण्णा टिंगरे यांनी हा प्रकल्प पूर्व पुण्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.