पुणे प्रतिनिधी….पुण्यात पहिल्याच जोरदार पावसाने शहरातील अनेक भाग जलमय झाले असून महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मधील विविध परिसरांत छातीएवढे पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. कलवड येथील इस्टरलिया सोसायटी, पोरवाल रोडवरील एलिमेंटो सोसायटी, हवालदार मळा येथील लेक शोअर सोसायटी तसेच एअरपोर्ट रोडवरील ५०९ चौकासह अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे पुणे महानगरपालिकेच्या पावसाळापूर्व नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, शांतीनगर आणि आदर्श इंदिरानगर परिसरातील पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी वार्ड ऑफिसर संजय पोळ, अजयदादा सावंत, नगरसेवक रवी टिंगरे तसेच इतर सहकारी उपस्थित होते.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक सूचना देण्यात आल्या. पूरग्रस्त भागात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याची मागणीही पुणे महानगरपालिकेकडे करण्यात आली.
तसेच, महावितरण प्रशासनाशी तातडीने संपर्क साधून वीजपुरवठ्याबाबत आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होऊ नये.
प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही अडचण उद्भवल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
