पिंपरी, प्रतिनिधी : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. दत्तनगर येथील बिर्ला रुग्णालयाजवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने डांगे चौक–चिंचवड मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बिर्ला रुग्णालय चौकात वाहतूक रोखण्यात आली असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळे अनेक ठिकाणी ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवरही पाणी साचल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. थेरगाव येथील केजुदेवी बंधाराही ओव्हरफ्लो झाला असून, पवना नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे.
नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, तसेच नदी व बंधाऱ्यांच्या परिसरात पाहण्यासाठी किंवा छायाचित्रणासाठी गर्दी करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी केले आहे.
तसेच, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवून सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
