पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी….निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाणपुलाच्या गोलाकार भागात अलीकडील मुसळधार पावसानंतर मोठे भगदाड पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा बसवेश्वर पुतळा ते अंकुश चौक (निगडी ग्रेड सेपरेटर) हा मार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करून उड्डाणपुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे बांधकाम सन २०१८ ते २०२० या कालावधीत सुमारे १४५ कोटी रुपये खर्चून करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी संबंधित ठेकेदार कंपनीला १८ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर सहा महिन्यांची मुदतवाढही देण्यात आली. मात्र एवढा मोठा खर्च करूनही उड्डाणपुलावर वारंवार भगदाड पडत असल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
यापूर्वीही याच उड्डाणपुलावर भगदाड पडल्याची घटना घडली होती. त्यावेळी संबंधित ठेकेदार कंपनीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावर ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर पुन्हा भगदाड पडल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार कंपनीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच आवश्यक असल्यास झालेल्या खर्चाची वसुली करावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे. तसेच उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तो सुरक्षित असल्याची खात्री होईपर्यंत आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणीही त्यांनी केली.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे विभागीय आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती सचिन काळभोर यांनी दिली. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला.
