पुणे : आनंद मार्ग प्रचारक संघ, पुणे यांच्या वतीने नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन, नैतिक मूल्ये आणि आध्यात्मिक जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने चिंबळी येथे तीन दिवसीय मोफत योग परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाला नागरिक, विद्यार्थी, योगसाधक आणि स्थानिक रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
परिसंवादाचे उद्घाटन मुख्य प्रशिक्षक आचार्य सिद्धविद्यानंद अवधूत यांच्या हस्ते झाले. तीन दिवसांच्या या उपक्रमात आचार्य सिद्धविद्यानंद अवधूत, आचार्य योगेश्वरानंद अवधूत, आचार्य रागतीतानंद अवधूत, आचार्य निर्भयानंद अवधूत तसेच प्रफुल्ल भावेकर आणि भुक्ती प्रधान यांनी योग, ध्यान, शिस्तबद्ध जीवनशैली आणि आधुनिक जीवनातील ताणतणावावर मात करण्याबाबत मार्गदर्शन केले.
पुणे पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आचार्य सिद्धविद्यानंद अवधूत यांनी सांगितले की, आनंद मार्ग ही १९५० मध्ये श्री श्री आनंदमूर्तीजी यांनी स्थापन केलेली जागतिक सामाजिक व आध्यात्मिक संस्था असून, योग, ध्यान, मानवसेवा आणि आध्यात्मिक साधनेद्वारे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात निरोगी जीवनशैली, मानसिक शांतता आणि सामूहिक कल्याणाविषयी जनजागृती होण्यास मोठी मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.परिसंवादात सहभागी झालेल्या शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
