पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी महिला प्रवाशाला हरवलेले पाकीट सुखरूप परत केले
पुणे, प्रतिनिधी : पीएमपीएमएलच्या चालक, वाहक आणि स्टार्टर कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षतेमुळे एका महिला प्रवाशाला बसमध्ये हरवलेले ₹८ हजार ७०० रोख रक्कम व घराच्या चावीसह असलेले पाकीट सुखरूप परत मिळाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडले.
वारजे गणपती माथा येथील रहिवासी सौ. सुनिता नेताजी यावे या कर्वे पुतळा येथून पीएमपीएमएलच्या बसने गणपती माथा येथे प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी नियमित तिकीट काढले होते. मात्र गणपती माथा येथे उतरून घरी गेल्यानंतर त्यांचे पाकीट बसमध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाकिटामध्ये ₹८ हजार ७०० रोख रक्कम तसेच घराच्या कुलपाची चावी होती.
घाबरलेल्या अवस्थेत त्या गणपती माथा पीएमपीएमएलच्या स्थानकावर आल्या आणि तेथील स्टार्टर हरिश्चंद्र तांदळे यांना घडलेला प्रकार सांगितला. तिकीट क्रमांक १४४/३ तपासून श्री. तांदळे यांनी तत्काळ एनडीए गेट क्रमांक १० येथील स्टार्टर राजाभाऊ ओव्हाळ यांच्याशी संपर्क साधला.
दरम्यान, संबंधित बस एनडीए गेट येथे पोहोचल्यानंतर श्री. ओव्हाळ यांनी चालक गणेश कदम यांच्याकडे चौकशी केली. चालकांनी बसमध्ये सापडलेले पाकीट सुरक्षिततेसाठी वाहक गणेश बारवकर यांच्याकडे दिल्याचे सांगितले. वाहकांनी पाकीट श्री. ओव्हाळ यांच्या स्वाधीन केले. तपासणीअंती पाकिटातील ₹८ हजार ७०० रोख रक्कम आणि घराची चावी सुरक्षित असल्याचे आढळून आले.
त्यानंतर श्री. ओव्हाळ यांनी गणपती माथा येथील स्टार्टर हरिश्चंद्र तांदळे यांना संपर्क करून महिला प्रवाशाला धीर देण्यास सांगितले. काही वेळातच संबंधित बस गणपती माथा येथे आल्यानंतर चालक गणेश कदम, वाहक गणेश बारवकर आणि स्टार्टर हरिश्चंद्र तांदळे यांच्या उपस्थितीत सौ. सुनिता यावे यांना त्यांचे पाकीट व त्यातील सर्व साहित्य सुखरूप परत करण्यात आले.
यावेळी भावूक झालेल्या सौ. सुनिता यावे यांनी पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “हे पाकीट इतर कोणाच्या हाती पडले असते तर ते पुन्हा मिळाले नसते. मात्र पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांमुळे माझी रक्कम आणि चावी सुरक्षित परत मिळाली,” अशी भावना व्यक्त केली.
या घटनेमुळे पीएमपीएमएलच्या चालक, वाहक आणि स्टार्टर कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव आणि प्रवाशांप्रती असलेल्या सेवाभावाचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
