केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार लोकार्पण; ‘संघ शाखेची गोष्ट’ व ‘समिधा’ ग्रंथाचेही प्रकाशन
मुंबई, दि. १ जुलै : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘विवेक’तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘कालजयी श्रीगुरुजी’ या विशेषांकाचे प्रकाशन गुरुवार (दि. २) रोजी सकाळी १० वाजता वडाळा येथील निको हॉलमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक रवींद्र संघवी तसेच हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
संघसंस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘विवेक’तर्फे दरवर्षी विशेषांक प्रकाशित केला जातो. यापूर्वी डॉ. हेडगेवार, बाळासाहेब देवरस, अशोकजी सिंघल, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील विशेषांक प्रकाशित करण्यात आले होते. यंदा संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी (माधव सदाशिव गोलवलकर) यांच्या जीवनकार्य, राष्ट्रदर्शन आणि वैचारिक योगदानावर आधारित विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे.
या विशेषांकामध्ये श्रीगुरुजींचे राष्ट्रजीवनाविषयीचे चिंतन, तत्त्वनिष्ठा, चारित्र्य, सनातन मूल्यांवरील भूमिका आणि आजच्या काळातील त्यांच्या विचारांची उपयुक्तता यांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. बदलत्या काळात राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भारतीय विचारांची कालसुसंगत अभिव्यक्ती कशी असावी, याविषयीचे त्यांचे मार्गदर्शनही विशेषांकात समाविष्ट करण्यात आले आहे.
याच कार्यक्रमात विश्राम बापट लिखित ‘संघ शाखेची गोष्ट’ या पुस्तिकेचे तसेच १०१ प्रचारकांची माहिती देणाऱ्या ‘समिधा’ या हिंदी ग्रंथाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.
या प्रकाशन सोहळ्यास विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
