पुणे, ता. मुळशी : हिंजवडी पोलिसांनी बांधकामावरील सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यामुळे झालेल्या कामगाराच्या मृत्यूप्रकरणी बिल्डिंग मालक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४३८/२०२६ अन्वये बीएनएस कलम १०५ व ३(५) अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीमती ताराबाई बाळासो महांगरे (वय ६०, रा. हिंजवडी, मूळ गाव विंग, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, हा गुन्हा २६ जून २०२६ रोजी रात्री ९.०८ वाजता दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मारुंजी येथील सेव्हन स्टार सिटी या बांधकाम प्रकल्पात ही दुर्घटना घडली. बांधकामाचे साहित्य जिन्यातून चौथ्या मजल्यावर नेत असताना कामगार अशोक महांगरे यांचा तोल जाऊन ते खाली पडले. गंभीर जखमी झालेल्या अशोक महांगरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तपासात बांधकामस्थळी जिन्याला सुरक्षा जाळी, कठडे तसेच कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे समोर आले. कामगारांच्या जीवितास धोका असल्याची जाणीव असूनही सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता काम करण्यास भाग पाडल्याने हा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी बिल्डिंग मालक व्यंकट रामानौ सांगना (वय ४८, रा. पुणे) आणि ठेकेदार संजय रामसुख राजभर (वय २५, रा. मारुंजी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.