आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिवछत्रपती लिनिअर अर्बन गार्डन येथे सामूहिक योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपळे सौदागर, दि. २१ जून २०२६ : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत पिंपळे सौदागर येथे रविवारी सकाळी आयोजित सामूहिक योग व प्राणायाम शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय जनता पार्टी रहाटणी-पिंपळे सौदागर आणि द आर्ट ऑफ लिविंग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती लिनिअर अर्बन गार्डन येथे हा उपक्रम पार पडला.
या योग शिबिराला भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी नागरिकांसमवेत योगसाधना करत योगाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमास नगरसेविका कुंदाताई भिसे, नगरसेविका अनिताताई काटे, पवना सहकारी बँकेचे संचालक जयनाथ काटे, समाजसेवक संदेश काटे पाटील, संजयशेठ भिसे, संदिपशेठ काटे, दिनेश काटे पाटील, मनोजराव ब्राम्हणकर यांच्यासह द आर्ट ऑफ लिविंगचे अमित मगर, राजेश पाटील, सुप्रिया पाटील, प्रविणशेठ कुंजीर, बाळकृष्ण परघळे, दिपक गांगुर्डे, समीर देवरे, विजय पाटील, शितल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
भजनाच्या तालावर योगासने; सत्यजित भैया यांचे मार्गदर्शन
या शिबिराचे मुख्य आकर्षण ठरले ते द आर्ट ऑफ लिविंगचे सत्यजित भैया यांचे मार्गदर्शन. भजनाच्या चैतन्यमय ठेक्यावर त्यांनी उपस्थितांकडून विविध योगप्रकार आणि कठीण आसने सहजतेने करून घेतली. भजन आणि योग यांचा सुंदर संगम अनुभवताना संपूर्ण परिसर सकारात्मक ऊर्जेने भारून गेला होता. यावेळी त्यांनी योग करण्याची अचूक पद्धत, नियमित योगसाधनेचे आरोग्यदायी फायदे आणि दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व याविषयीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
५ वर्षांच्या सई थेऊरकरची योगकला ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू
कार्यक्रमातील आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे अवघ्या ५ वर्षांच्या सई थेऊरकर हिने व्यासपीठावरून सादर केलेली कठीण योगासने. तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. तिच्या या कौशल्याचे सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले. तसेच प्रीती मानकर यांनी संगीताच्या तालावर सादर केलेल्या ‘टाळी योगा’ या नाविन्यपूर्ण प्रकाराने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.
‘ हा शरीर, मन आणि आत्म्यायोगला जोडणारा सेतू’ – शत्रुघ्न काटे
“योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारे एक प्रभावी शास्त्र आहे. आधुनिक धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता, आंतरिक ऊर्जा आणि उत्तम आरोग्यासाठी योग हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे भारताची प्राचीन योगपरंपरा आज जगभर पोहोचली आहे. प्रत्येक नागरिकाने ‘रोज योग, रोज आरोग्य’ हा संकल्प आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा.”
……शत्रुघ्न काटे,भाजपा, शहराध्यक्ष.
या सामूहिक योग शिबिरात परिसरातील अबालवृद्ध, महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत निरोगी जीवनाचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.
