पिंपरी, दि.१९ जून : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत दोन गांजा तस्करांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा, स्कॉर्पिओ वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ५७ लाख ७३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस कर्मचारी निखिल वर्षे आणि विजय दौंडकर यांना संशय आल्याने त्यांनी सापळा रचला. दि. १८ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुबी बेकरी परिसर, खंडोबा माळ, चाकण येथे दोन संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली.
यामध्ये अनिकेत राजेंद्र बिरंगळ (वय २४, रा. खंडोबा माळ, चाकण) आणि कुशल उद्धव पाठक (वय २४, रा. शिवसाई नगर, कोथरूड, पुणे) यांच्याकडून ४१ लाख ९८ हजार रुपयांचा ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा, ७५ हजार रुपयांचे तीन मोबाईल फोन, ५१० रुपये रोख तसेच १५ लाख रुपयांची स्कॉर्पिओ गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध चाकण उत्तर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडे करीत आहेत.
दरम्यान, अंमली पदार्थांविषयी कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी अंमली पदार्थ विरोधी पथक (८६००००२३२०), पोलीस हेल्पलाईन ११२ किंवा मानस हेल्पलाईन १९३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह विक्रम गायकवाड, रोहित दिवटे, जिलानी मोमीन, जावेद बागसिराज, ज्ञानेश्वर मुळे, किशोर परदेशी, निखिल शेटे, विजय दौंडकर, सदानंद रुद्राक्षे, निखिल वर्षे, कपिलेश इगवे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तांत्रिक विश्लेषणासाठी सुभाष गुरव आणि प्रकाश ननावरे यांनी सहकार्य केले.
