पिंपरी, दि. १९ जून २०२६ : शहराला अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘हरित पिंपरी-चिंचवड’ अभियानाला अधिक बळ देत महापौर रवि लांडगे यांनी महानगरपालिका क्षेत्रातील वृक्षतोडीच्या वाढत्या घटनांवर कठोर भूमिका घेतली आहे. अनधिकृत वृक्षतोड रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यासह दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी शहरात तब्बल पाच लाख वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन वृक्ष लागवडीबरोबरच विद्यमान वृक्षसंपदा जतन करणेही तितकेच आवश्यक असल्याचे महापौर लांडगे यांनी स्पष्ट केले.
तापमानवाढ, वायू प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय समतोल यांचा विचार करून वृक्षतोडीच्या प्रस्तावांना परवानगी देताना अत्यंत दक्षता बाळगावी, संबंधित प्रकरणांमध्ये पर्यायी उपाय, वृक्ष स्थलांतरण (ट्रान्सप्लांटेशन) आणि वृक्षतोडीची अपरिहार्यता यांची सखोल तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले आहेत.
महापौरांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनांमध्ये अनधिकृत वृक्षतोड रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविणे, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षांचे संरक्षण व संवर्धन अधिनियम १९७५ अंतर्गत दोषींवर कठोर कारवाई करणे, मंजूर वृक्षतोडीच्या प्रकरणांतील पुनर्लागवडीची प्रत्यक्ष पडताळणी करणे आणि वृक्ष प्राधिकरण समितीच्या निर्णयांमध्ये पर्यावरण संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देणे यांचा समावेश आहे. तसेच वृक्षतोड, पुनर्लागवड आणि संबंधित कारवाईची माहिती नागरिकांसाठी पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला आहे.
यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “हरित पिंपरी-चिंचवड ही केवळ मोहीम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवेगार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर घडविण्याचा संकल्प आहे. वृक्षतोडीच्या प्रत्येक प्रकरणाची काटेकोर तपासणी केली जाईल. पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या कोणत्याही प्रकाराला पाठीशी घातले जाणार नाही.”
पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे सांगत शहरातील नागरिकांनी वृक्षसंवर्धनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा तसेच अनधिकृत वृक्षतोड आढळल्यास प्रशासन किंवा महापौर कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही महापौरांनी केले.
