पिंपरी : रेल्वे आणि वन विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तिघांकडून तब्बल २१ लाख ८७ हजार ७३ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात दोन जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी हितेश सुरेश कुलकर्णी (वय ३५, रा. सुखवानी पॅनोरमा, सुशगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रम पवार (रा. डांबरीतांडा, जि. जालना), निलेश वाकचौरे (रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) तसेच तपासात निष्पन्न होणाऱ्या इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२३ पासून ते आजपर्यंत कुणाल हॉटेल, काळेवाडी तसेच ऑनलाईन माध्यमातून आरोपींनी फिर्यादी व इतरांना भारतीय रेल्वे आणि वन विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी फिर्यादी हितेश कुलकर्णी यांच्याकडून ७ लाख ८७ हजार रुपये, साक्षीदार अंकुश किसन राठोड यांच्याकडून ४ लाख ३० हजार रुपये आणि प्रशांत विठ्ठलराव जाधव यांच्याकडून ९ लाख ७० हजार ७३ रुपये अशी एकूण २१ लाख ८७ हजार ७३ रुपयांची रक्कम उकळली.
त्यानंतर आरोपींनी संबंधितांना बनावट जॉइनिंग लेटर व इतर कागदपत्रे देऊन सरकारी नोकरी लागल्याचा विश्वास निर्माण केला. मात्र प्रत्यक्षात कोणतीही नोकरी न लावता आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाल्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आली.
या प्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३३६(२), ३३८, ३३६(३), ३४० व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव करीत आहेत.
