पिंपरी, दि.१७ जून : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व विभागांची अद्ययावत माहिती असलेली अधिकृत डायरी पुन्हा छापून नगर सदस्य, पत्रकार तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात भोईर यांनी म्हटले आहे की, नागरिकांच्या तक्रारी, सूचना व विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी नगर सदस्य, पत्रकार आणि अधिकाऱ्यांना सातत्याने परस्पर संपर्क साधावा लागतो. सन २०१७ पर्यंत महानगरपालिकेकडून दरवर्षी अधिकृत डायरी उपलब्ध करून दिली जात होती. मात्र त्यानंतर ती बंद झाल्याने विविध विभागांचे कार्यालयीन पत्ते, अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, ई-मेल पत्ते आणि इतर आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध राहत नसल्यामुळे कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत.
नागरिकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करताना संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधणे कठीण होत असून त्यामुळे समस्या सोडविण्यास विलंब होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या सर्व विभागांची अद्ययावत माहिती समाविष्ट असलेली अधिकृत डायरी तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
या डायरीमध्ये सर्व विभागांचे कार्यालयीन पत्ते, विभागप्रमुख व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे व पदनाम, दूरध्वनी व मोबाईल क्रमांक, अधिकृत ई-मेल पत्ते, विभागनिहाय कार्यक्षेत्र व जबाबदाऱ्या, आपत्कालीन संपर्क क्रमांक तसेच प्रमुख समित्या व विभागांची संक्षिप्त माहिती समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अशी माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध झाल्यास नगर सदस्यांना नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे सुलभ होईल. तसेच पत्रकारांना अचूक माहिती मिळविणे सोपे जाईल आणि अधिकारी, लोकप्रतिनिधी व प्रसारमाध्यमांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण होईल. परिणामी प्रशासनाची कार्यक्षमता वाढून नागरिकांना अधिक चांगल्या व वेळेवर सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केला आहे.
