नाशिकरोड पोलिसांनी अट्टल दुचाकी चोराला जेरबंद करत ५ गुन्ह्यांचा केला पर्दाफाश
नाशिक, दि.१७ जून (प्रतिनिधी): नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने गस्ती दरम्यान एका अट्टल दुचाकी चोराला जेरबंद करून त्याच्याकडून पाच चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे नाशिकरोड व आहिल्यानगर परिसरातील एकूण पाच मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून सुमारे १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ३६१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हेशोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश राबडे आणि अर्जुन गीते हे गस्तीवर होते. सिन्नर फाटा परिसरातील डी.बी. मोबाइल शॉपजवळ गस्त घालत असताना महाराष्ट रसवंती गृहासमोर एक संशयित व्यक्ती पोलिसांना पाहून अर्धवट रसाचा ग्लास सोडून दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव ललित देवरे (रा. सिन्नर, जि. नाशिक) असे सांगितले. त्याच्याकडील दुचाकीबाबत कागदपत्रांची विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली. विविध पोलिस ठाण्यांतील अभिलेख तपासले असता त्याच्याविरुद्ध कल्याणसह अनेक ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
सखोल चौकशीत आरोपीने नाशिक व आहिल्यानगर परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून पाच चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. जप्त वाहनांमध्ये हिरो होंडा स्प्लेंडर, सुझुकी ॲक्सेस, टीव्हीएस विगो आणि होंडा युनिकॉर्न या वाहनांचा समावेश आहे.
पोलिस तपासात नाशिकरोड व आहिल्यानगर पोलिस ठाण्यांतील एकूण पाच मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत १ लाख ७८ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या उल्लेखनीय कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश झाला असून नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करावीत तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन नाशिकरोड पोलिसांनी केले आहे.पोलीसांनी संशियातांकडून हिरो होंडा स्प्लेंडर (MH 15 AY 2174),सुझुकी ॲक्सेस (MH 15 FC 4015),हिरो होंडा स्प्लेंडर (MH 15 BC 1054),टीव्हीएस विगो (MH 15 FE 7389),होंडा युनिकॉर्न (MH 17 CT 9943) अशी वाहनांसह रुपये १,७८,०००/- किंमतींचा मुद्देमाल जप्त केला असून एकुण ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
