पिंपरी-चिंचवड, – ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आयशर टेम्पोमधील सुमारे साडेदहा लाख रुपयांच्या केबल बॉक्सचा अपहार केल्याप्रकरणी चालकाविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निगडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ३८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (४) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हा गुन्हा १५ जून २०२६ रोजी रात्री ८.१३ वाजता नोंदविण्यात आला.
याप्रकरणी विजय अशोकराव कु-हे (वय ३८, रा. भोसले पगारिया टॉवर, फुगेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश विजय चव्हाण (वय ३२, व्यवसाय चालक, रा. शुभम पार्क, वराळे, ता. खेड, जि. पुणे) हा धनंजय रोड वेज प्रा. लि. या ट्रान्सपोर्ट कंपनीत आयशर टेम्पो चालक म्हणून कार्यरत होता. ५ मे २०२६ रोजी ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथून मुंबईतील लोहार चाळ परिसरातील पत्त्यावर माल पोहोचविण्यासाठी आयशर टेम्पो (क्र. MH-14 KQ-3474) घेऊन रवाना झाला होता.
मात्र, टेम्पोमधील फिनोलेक्स कंपनीच्या केबलचे बॉक्स, अंदाजे १० लाख ५४ हजार ९२९ रुपये किमतीचा माल, नियोजित ठिकाणी पोहोचविण्याऐवजी त्याचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी निगडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप अटकेत नसल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुटे करीत आहेत.