पिंपरी, – पिंपळे गुरव येथील वैभवलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये पार्किंगच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास वैभवलक्ष्मी अपार्टमेंट, लक्ष्मीनगर लेन क्रमांक ३, पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी आशा राजुकटराज (वय ५३, रा. वैभवलक्ष्मी अपार्टमेंट, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी शिवराज वाघमारे, त्यांची पत्नी पुष्पा वाघमारे आणि मुलगा महेश वाघमारे यांनी पार्किंगच्या कारणावरून फिर्यादी व त्यांचा भाचा आशिष यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. तसेच धमकी देत मारहाण केली. या मारहाणीत आशिष यांचा अंगठा मुरगळून फ्रॅक्चर झाल्याने ते जखमी झाले.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११७(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार करीत आहेत.
