भोसरी : एमआयडीसी भोसरी परिसरातील एका कंपनीसाठी मागविण्यात आलेल्या सीआरसीए स्क्रॅपपैकी सुमारे ७ मेट्रिक टन मालाचा अपहार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अस्लम बशीर शेख (वय ४०, रा. दत्तनगर, थेरगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विकास मानिक लाटे (रा. देहूगाव, पुणे) आणि संतोष लाटे (रा. मोशी, पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथील कोरस इंडिया लिमिटेड (पेफको फाऊंड्री विभाग) या कंपनीने एस.बी.ए. मेटल अँड स्टील प्रा. लि., कुरुळी (ता. खेड, जि. पुणे) येथून २०.३८० मेट्रिक टन सीआरसीए स्क्रॅपची मागणी केली होती. त्यानुसार ट्रक (एमएच १४ बीजे ३४२९) मधून १० लाख ५८ हजार १२९ रुपये किमतीचा माल कंपनीकडे पाठविण्यात आला होता.
मात्र, कंपनीत माल उतरविताना केवळ १३ मेट्रिक टन माल उतरविण्यात आला. उर्वरित ७ मेट्रिक टन, सुमारे ३ लाख ६४ हजार रुपये किमतीचा माल कंपनीत न उतरविता त्याचा परस्पर अपहार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.