खाजगी संस्थेला भूखंड देण्यास श्रुती वाकडकरांचा विरोध
पिंपरी, दि.१६ जून : पुनावळे-ताथवडे परिसरातील आरक्षित भूखंड खाजगी शैक्षणिक संस्थेला ३० वर्षांच्या भाडेकरारावर देण्याच्या प्रस्तावाला नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्य श्रुती राम वाकडकर यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर बोलताना त्यांनी प्रशासनाला जाब विचारत संबंधित जागेवर महापालिकेची स्वतःची सीबीएसई शाळा उभारण्याची मागणी केली.
प्रभाग क्रमांक २५ अंतर्गत वाकड-पुनावळे-ताथवडे परिसरातील सुमारे ०.९१ हेक्टर (९,१०० चौ.मी.) आरक्षित जागा एका खाजगी शैक्षणिक संस्थेला ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सभेपुढे ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावातून महापालिकेला वार्षिक सुमारे सात कोटी रुपये भाडे मिळणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
यावर आक्षेप घेताना श्रुती वाकडकर म्हणाल्या की, शिक्षण हा शहराच्या आणि नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालकीच्या मौल्यवान आरक्षित जागा खाजगी संस्थांच्या ताब्यात देण्याऐवजी त्या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक सुविधा उभारल्या पाहिजेत.
सभागृहात बोलताना त्यांनी वाकड, पुनावळे, ताथवडे आणि हिंजवडी परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा उल्लेख केला. या भागात मोठ्या प्रमाणावर कष्टकरी, मध्यमवर्गीय आणि नोकरदार कुटुंबे वास्तव्यास असून खाजगी शाळांच्या वाढत्या शुल्कामुळे पालकांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत महापालिकेच्या सीबीएसई शाळा हा सर्वसामान्यांसाठी आशेचा किरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
वाकडकर यांनी प्रशासनाला दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. पुनावळे-ताथवडे येथील जागा खाजगी संस्थेला दिल्यास महापालिकेची स्वतःची सीबीएसई शाळा उभारण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध आहे का, तसेच सरकारी भूखंड उपलब्ध असताना गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संधी कमी करून खाजगी संस्थांना प्राधान्य का दिले जात आहे, असा सवाल त्यांनी केला.
वाकड येथे महापालिकेने उभारलेल्या ‘सावित्रीबाई फुले सीबीएसई शाळे’चा आदर्श समोर ठेवून पुनावळे आणि ताथवडे परिसरातही अशाच धर्तीवर आधुनिक व दर्जेदार महापालिका सीबीएसई शाळा उभारण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
“जोपर्यंत पुनावळे-ताथवडे परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून त्या जागेवर महापालिकेची स्वतःची सीबीएसई शाळा उभारण्याचा निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत लीजचा कोणताही प्रस्ताव मंजूर करू नये,”
……श्रृती वाकडकर नगरसेविका पिंपरी चिंचवड
दरम्यान, श्रुती वाकडकर यांच्या या भूमिकेला स्थानिक पालक आणि नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, प्रस्तावाबाबत पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
