वाई येथे राज्यस्तरीय सोहळ्यात सन्मान; विविध क्षेत्रांतील योगदानाची दखल
सातारा (जिल्हा)प्रतिनिधी दि.१६ जून २०२६ : भोसरीगावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते पैलवान काळुराम लांडगे यांना सातारा जिल्ह्यातील वाई येथे आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात ‘राष्ट्रीय संत प्रेरणा गौरव पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.
वाई येथील रमेश गरवारे सभागृह, लोकमान्य टिळक ग्रंथालय येथे विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र राज्य (महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या २८ मान्यवरांना गौरविण्यात आले.
पैलवान काळुराम लांडगे यांनी समाजातील वंचित, निराधार, गरजू, पीडित आणि उपेक्षित घटकांसाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. समाजाच्या अंधारलेल्या वाटांवर आशेचा दीप बनून त्यांनी अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात माणुसकी, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा निर्माण होत असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.
कला, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, पत्रकारिता, साहित्य, उद्योग तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांना ‘संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार २०२६’ देखील प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा डीआरडीओचे माजी अधिकारी डॉ. अशोक नगरकर, वाई पंचायत समितीच्या उपसभापती वर्षाताई जगताप आणि सामाजिक कार्यकर्ते पैलवान तुषारभाऊ जगताप यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व मानाचा फेटा देऊन लांडगे यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास पुरस्कारार्थी, त्यांचे नातेवाईक तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कोचळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
