फलटण, दि. ११ जून– सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मुरूम येथील बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निरा-मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात दोन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाल्यानंतर गंभीर जखमी असलेल्या त्यांच्या लहान भावाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मुरूम गावासह फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात कु. सेजल ज्ञानेश्वर बोडरे (१७) व कु. अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (१५) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर त्यांचा लहान भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (१२) हा गंभीर जखमी झाला होता. पुणे येथे उपचार सुरू असताना पवनचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे एकाच कुटुंबातील तिन्ही भावंडांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही तिन्ही भावंडे बारामती तालुक्यातील मुर्टी येथे मामाच्या गावाला जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटीवरून निघाली होती. चौधरवाडी फाट्यानजीक त्यांच्या स्कुटीची समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोशी जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की सेजल आणि अक्षरा यांचा जागीच मृत्यू झाला, तर पवन गंभीर जखमी झाला होता.
शिक्षणात हुशार, नम्र स्वभावाची आणि सर्वांच्या लाडकी असलेली ही तिन्ही भावंडे एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्याने मुरूम गावासह संपूर्ण पंचक्रोशीत शोक व्यक्त केला जात आहे. बोडरे कुटुंबाचे आयुष्य या दुर्घटनेमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, गावकऱ्यांसह नातेवाईकांकडून कुटुंबीयांचे सांत्वन केले जात आहे.
तीन निष्पाप जीवांचा झालेला हा दुर्दैवी अंत अनेकांच्या मनाला चटका लावून गेला असून, निरा-मोरगाव मार्गावरील वाढत्या अपघातांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
