तीन आरोपी जेरबंद;१२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त, चैन चोरीचा गुन्हा उघड
पिंपरी-चिंचवड, दि.१४ जून २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत चैन चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली ३३.८१० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण १२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील चैन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेच्या सर्व युनिटना विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन दोन अज्ञात आरोपींनी जबरदस्तीने हिसकावून नेली होती. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून सुरू होता.
शनिवार दि.१३ जून रोजी पथकातील पोलिसांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी चैन चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
वैष्णव शरद कदम (वय २० वर्षे),सचिन जालिंदर कदम (वय ४२ वर्षे),विजय ज्ञानेश्वर कदम (वय ३३ वर्षे) यांना अटक केली असून हे सर्व रा.निरगुडी, ता. हवेली, जि. पुणे येथील रहिवासी आहेत.
आरोपींकडून चोरीस गेलेली ४ लाख ९५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन तसेच ८ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. एकूण १२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, महेश खांडे तसेच अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.चैन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने करून आरोपींना जेरबंद करण्याची पिंपरी-चिंचवड पोलिसांची ही आणखी एक प्रभावी कामगिरी मानली जात आहे.
