जेसीबीच्या सहाय्याने सहा अवैध दारू अड्डे जमीनदोस्त; पोलीस, उत्पादन शुल्क व एमआयडीसीची संयुक्त मोहीम
पिंपरी-चिंचवड, दि. १२ जून: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध हातभट्टी दारू विक्रीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि एमआयडीसी प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अवैध हातभट्टी दारू विक्रीची सहा ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केली.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-४) श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.
अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या सराईत आरोपींवर विशेष लक्ष ठेवून पोलीस पथकाने तपास सुरू केला होता. तपासादरम्यान संबंधित दारू विक्रीची ठिकाणे अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एमआयडीसी प्रशासनाशी समन्वय साधून ती हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.
१) दुरेश रमेश राठोड – सिग्मा चौक, महाळुंगे,२)लखन जडज्या शिंदे – सिग्मा चौक, महाळुंगे,३)पुष्पादेवी शांतिलाल जाट – हिंदुस्थान पेट्रोल पंप परिसर, तळवडे,४)लखन हाजुरिया ठाकूर – डी.के. चौक, कुरुळी,५)उदय अशोक कलाल – एच.पी. पेट्रोल पंपाजवळ, तळवडे रोड,६)सुष्मिता बंडू हितेज – सुभाषवाडी, निगडी या आरोपींच्या अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली.
संयुक्त कारवाईदरम्यान या सर्व ठिकाणांवरील अनधिकृत बांधकामे आणि अवैध दारू विक्री केंद्रे जेसीबीच्या सहाय्याने पाडून टाकण्यात आली. त्यामुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.
अवैध धंद्यांविरोधात कारवाई आणखी तीव्र होणार
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभाग, एमआयडीसी प्रशासन तसेच दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस प्रशासनाने अवैध हातभट्टी दारू विक्री आणि संबंधित गुन्हेगारी कारवायांविरोधात भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
“अवैध दारू अड्ड्यांवर बुलडोझर”
महाळुंगे एमआयडीसी परिसरात राबविण्यात आलेल्या या धडक मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, कायद्याचा धाक निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
