रेड कॉर्नर नोटीसद्वारे बँकॉक विमानतळावर कारवाई; पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कामगिरी
पिंपरी-चिंचवड, दि. १२ जून : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी सिंडिकेटचा पर्दाफाश करत दुबई व थायलंडमधून भारतातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीस (RCN) आणि लुकआऊट सर्क्युलर (LOC) च्या आधारे आरोपीला थायलंडमधील बँकॉक विमानतळावर ताब्यात घेण्यात आले असून भारतात आणल्यानंतर त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे.
सायबर फसवणुकीशी संबंधित देहूरोड पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक २९३/२०२४, हिंजवडी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ७७०/२०२४ आणि सायबर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक १२/२०२५ या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान आरोपी सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे याचे नाव समोर आले होते. देहूरोड पोलीस ठाण्यातील ऑनलाईन टास्क स्कॅम प्रकरणात जून २०२४ मध्ये १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून गणेश काळे हा दुबईमध्ये बसून भारतातील विविध बँक खात्यांचा वापर करून सायबर फसवणुकीचे व्यवहार नियंत्रित करत असल्याचे उघड झाले.
तपासात आरोपी भारतातील नागरिकांकडून बँक खाती व त्यासंबंधित माहिती मिळवून त्या खात्यांद्वारे सायबर गुन्ह्यातील रकमेची देवाणघेवाण करत असल्याचे निष्पन्न झाले. चीनसह इतर परदेशी नागरिकांच्या संपर्कातून तो टास्क फ्रॉड, शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक तसेच डिजिटल अरेस्टसारख्या विविध सायबर गुन्ह्यांमध्ये सक्रिय होता.
सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी केलेल्या तांत्रिक तपासातून आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र शासनामार्फत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आरोपीच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. दरम्यान, सप्टेंबर २०२५ मध्ये गणेश काळे दुबईहून बँकॉक, थायलंड येथे पळून गेल्याची माहिती मिळाली.
सायबर पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा करत आरोपीविरुद्ध इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस आणि लुकआऊट सर्क्युलर जारी करून घेतले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समन्वयातून आरोपी दुसऱ्या देशात पळून जाण्याच्या तयारीत असताना थायलंडमधील बँकॉक विमानतळावर सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले.
दिनांक ११ जून २०२६ रोजी मुंबई विमानतळावर सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस हवालदार हेमंत खरात आणि पोलीस शिपाई नितेश बिचेवार यांच्या पथकाने आरोपीचा ताबा घेतला. त्यानंतर देहूरोड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करीत आहेत.
या अटकेमुळे मुंबई व तेलंगणा राज्यातील अनेक सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरोपीविरुद्ध नोडल सायबर पोलीस ठाणे मुंबई, मालवणी पोलीस ठाणे मुंबई तसेच सायबराबाद पोलीस स्टेशन, तेलंगणा येथेही गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सायबर पोलीस ठाण्याच्या संपूर्ण पथकाने या तपासात मोलाची भूमिका बजावली.
