ग्रामीण विद्यार्थ्यांनी सिद्ध केली गुणवत्ता
बेल्हे-बांगरवाडी, प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जिद्द, मेहनत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर समर्थ ज्युनिअर कॉलेज, बेल्हे-बांगरवाडीच्या विद्यार्थ्यांनी MHT-CET (PCB) २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.
या परीक्षेत रिद्धी थिटे हिने ९७.५४ पर्सेंटाईल गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ वैष्णवी येवले (९५.८०), दिव्या औटी (९३.५५), आयुष वाघुले (९३.१७), ईश्वरी दाते (९२.३५) आणि श्रुती शिंदे (९२.०७) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.
तसेच श्रुती जोरी, ज्ञानेश्वरी जाधव, प्रतिक्षा गाडेकर, तनुजा औटी, श्रुतिका येवले, चैत्राली साळवे, नेहा हाडवळे, मिनाक्षी लामखडे, इम्रान सय्यद, अनुष्का गाजरे, श्रीराम दांगट, स्नेहल भंडलकर आणि वेदिका रवळे यांनीही उत्कृष्ट पर्सेंटाईल मिळवत महाविद्यालयाच्या यशस्वी परंपरेत भर घातली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचे प्रभावी मार्गदर्शन मिळावे यासाठी समर्थ शैक्षणिक संकुल सातत्याने प्रयत्नशील आहे. इयत्ता अकरावीपासूनच विद्यार्थ्यांना MHT-CET परीक्षेची शास्त्रशुद्ध तयारी करून घेतली जाते. नियमित अध्यापन, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, विशेष सराव परीक्षा आणि विद्यार्थ्यांची अथक मेहनत यामुळे हे यश मिळाल्याचे प्राचार्या सौ. वैशाली आहेर यांनी सांगितले.
या यशामागे प्रा. संतोष पोटे, प्रा. राजेंद्र नवले, प्रा. विनोद चौधरी, प्रा. अमोल खामकर, प्रा. नूतन पोखरकर, प्रा. रोहिणी औटी, प्रा. सोनल बांगर आणि प्रा. वैशाली ढाकोळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माउलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत तसेच सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण मातीतून घडलेले हे गुणवंत विद्यार्थी आता वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडविण्यास सज्ज झाले असून, त्यांच्या यशामुळे समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्तेची साक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
