पिंपरी, दि.११ जून – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या परवाना शुल्कामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून सर्व प्रभागांमध्ये एकसमान शुल्क आकारणी करण्याची मागणी केली आहे.
काळभोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या “अ” क्षेत्रीय कार्यालयात मंडप परवाना शुल्क प्रति चौरस फूट १० रुपये आकारले जात आहे. तर “फ” क्षेत्रीय कार्यालयात त्याच प्रकारच्या मंडपासाठी प्रति चौरस फूट ५० रुपये शुल्क आकारले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक, सामाजिक संस्था, मंडळे आणि सेवाभावी संघटनांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून काही भागांतील नागरिकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त विविध संस्था, मंडळे व स्वयंसेवी संघटनांकडून वारकरी बांधवांसाठी मोफत अन्नदान, वैद्यकीय सेवा, औषध वाटप, चहा-नाश्ता, रेनकोट व छत्री वाटप यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मात्र मंडप परवान्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयांकडून भिन्न दर आकारले जात असल्याने सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांच्या आयोजनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिका हद्दीतील सर्व आठ प्रभागांमध्ये मंडप परवाना शुल्काचा एकसमान दर निश्चित करावा तसेच अवाजवी शुल्क आकारणी रद्द करून वाजवी व सुसंगत दर लागू करावेत, अशी मागणी सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
“सर्व प्रभागांमध्ये समान नियम आणि समान शुल्क आकारणी झाल्यास नागरिकांवरील आर्थिक भार कमी होईल आणि सेवाभावी संस्थांना पालखी सोहळ्यातील उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येतील,” असे सचिन काळभोर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
